कढीपत्ता नाटकातून उत्तम कौटुंबिक प्रबोधन

0

रत्नागिरी( Ratanagri) 

जेवणातील कढीपत्त्याप्रमाणे आपल्या आई-वडिलांना आजकालच्या मुलांनी आपल्या जीवनातून बाजूला करू नये, असा संदेश देणारे कढीपत्ता नावाचे कौटुंबिक प्रबोधनात्मक नाटक राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी सादर करण्यात आले.

रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेली ६३ वी राज्य हौशी मराठी स्पर्धा सुरू आहे, स्पर्धेतील सातवे नाटक कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघाने सादर केले. अनिल काकडे यांनी लिहिलेल्या या नाटकाला प्रसाद धोपट यांनी दिग्दर्शनातून उत्तम न्याय दिला आहे.

जेवणात कढीपत्त्यामुळे जेवणाला स्वाद येतो. तितकेच महत्त्व कुटुंबात आई-वडिलांना असते. जेवणातील कढीपत्ता सर्वांत आधी फोडणीला घातला जातो आणि प्रत्यक्ष जेवताना मात्र तो सुरुवातीलाच काढून टाकला जातो. आजकालची तरुण मुले कढीपत्त्याचा स्वाद विसरतात आणि आई-वडिलांना दूर करतात. ते तसे त्यांनी करू नये, कढीपत्त्याचा स्वाद कायम राखण्यासाठी आई-वडिलांना आपल्या जीवनात स्थान दिले पाहिजे, असा संदेश कढीपत्ता या नाटकाने दिला आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात तरुण मुलांना वाटते की आपले वडील आपल्याला विसरले, पण आपली मुले मोठी होऊन समाजात त्यांचे नाव व्हावे, त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत, म्हणून आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून पोटाला चिमटा घेऊन आईवडील सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. पण आपल्याला पाहिजे तेव्हा सगळे मिळते, म्हणून आपली गरज संपल्यानंतर मुले त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना कढीपत्त्यासारखे आपल्या आयुष्यातून बाजूला काढतात. वेळ प्रसंगी मुलांकडून चुका झाल्या तर त्यांच्यासाठी कठोर निर्णय घेणारे आई-वडीलच असतात. केवळ आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी ते असे पाऊल उचलतात. कढीपत्ता जेवणाला चव आणतो तसे प्रत्येकाने आई-वडील मुलांच्या आयुष्यात आनंद वाढत असतात. आपल्या स्वार्थासाठी त्यांना अलगद कढीपत्त्यासारखे बाजूला काढू नये. आजच्या परिस्थितीनुसार या नाटकाची कथा असून आई-वडील आणि मुले यांच्या नातेसंबंधावर भाष्य करणारे हे नाटक आहे.