

नागपूर (nagpur) – महानुभाव पंथीतील चरणांकित स्थळ असलेल्या जाळीचा देव या ठिकाणी दरवर्षी माघ शुद्ध चतुर्दशी आणि माघ शुद्ध पोर्णिमेला यात्रा भरते. राज्यभरातील लाखो महानुभाव अनुयायी याठिकाणी दर्शनासाठी येतात. श्रीक्षेत्र जाळीचा देव ते सावळेद्वार या स्थाना दरम्यान सर्वच अनुयायी जात असतात. या स्थानादरम्यान चालणाऱ्या वाटसरूंसाठी कचारी सावंगा येथील भक्तांकडून भव्य भोजनदानाची व्यवस्था केली आहे.
काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथील श्री पंचकृष्ण सेवाभावी महानुभाव मंडळाकडून दरवर्षी याठिकाणी अन्नदान कार्याक्रमाचे आयोजन केल्या जाते. यंदाचं हे 15 वे वर्षे आहे. सावळेद्वार ते जाळीचा देव या स्थानादरम्यान एका शेतात भव्य मंडपात अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस चालणाऱ्या यात्रेतील हजारो अनुयायांना अन्नदानाचा लाभ होतो. तसेच रात्रीच्या वेळी वाटसरूंसाठी चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. कचारी सावंगा येथील शंभरावर भक्त यात्रेसाठी डेरेदाखल होतात. तसेच नागपूर जिल्ह्यातील असंख्य अनुयायांचं कार्यक्रमाला सहकार्य लाभते. याशिवाय अन्नदान स्थळी भजन, पूजन, आरती आणि देवपूजा देखील केली जाते.