तोतया जीएसटी अधिकाऱ्याचा ट्रकमालकाला सव्वा लाखाचा गंडा

0

 

धुळे: पंजाबकडून पुण्याकडे जात असलेल्या ट्रक धुळ्यानजीक गुरुद्वाराजवळ अडविण्यात आला. जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करून पंजाबमधील ट्रक मालकाकडून १ लाख ३० हजार रुपये ऑनलाइन मागविल्यानंतर ट्रक सोडून देण्यात आल्याची घटना १७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी घडली होती.

मात्र चौकशीअंती हे अधिकारी खोटे असल्याचे ट्रक मालकाच्या लक्षात आले. त्यानंतर याप्रकरणी त्या अनोळखी चार जणांविरोधात आझादनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. कश्मीरसिंग सरदार हजारसिंग बाजवा (वय ५९, रा. पटियाला, पंजाब) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, पीबी ११ सीझेड ०७५६ क्रमांकाचा ट्रक पंजाब राज्यातील पटियाला येथून पुण्याच्या दिशेने निघाला.

या ट्रकमध्ये चिलिंग एअरकंडिशन मशीन ठेवलेले होते. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून हा ट्रक धुळ्यानजीक गुरुद्वाराजवळ पोहोचला, त्यावेळेस ४ जण खाकी रंगाचा ड्रेस परिधान करून लाल रंगाचा दिवा असलेल्या गाडीजवळ उभे होते. आम्ही जीएसटी विभागाचे अधिकारी आहोत, ट्रकची कागदपत्रे दाखवा अशी मागणी केली. कागदपत्रातील एका बिलात फर्मच्या नावात चूक असल्याचे सांगत ट्रक मालक कश्मीरसिंग सरदार हजारसिंग बाजवा यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला, १२ लाख ९६ हजारांची मागणी केली. पैसे दिले तरच ट्रक सोडण्याची भाषा नकली जीएसटी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

शेवटी तडजोडअंती १ लाख ३० हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. गुगल पेच्या माध्यमातून ही रक्कम टाकण्यात आली आणि त्यानंतर चौघांनी ट्रक सोडला. सखोल चौकशी केली असता असा कुठलाच प्रकार नसून ते चौघे जीएसटी विभागाचे अधिकारी नव्हते, त्यांनी फसगत केल्याचे लक्षात येताच कश्मीरसिंग यांनी आझादनगर पोलिस ठाणे गाठत दाखल केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली.