ॲग्रीकोज वेलफेअर सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; मानव विकास संस्थेला आर्थिक सहकार्य

0

ॲग्रीकोज वेलफेअर सोसायटी यांनी मानव विकास बहुउद्देशीय संस्था खापा (गव्हान), ता. काटोल, जि. नागपूर येथील आश्रयास असलेल्या रुग्णांसाठी साहित्य ठेवण्याकरिता पेटीच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले. हा उपक्रम ३१ ऑगस्ट २०२४ रोजी विष्णुजीकी रसोई येथे संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पार पडला.

मानव विकास संस्था मानसिक रुग्णालयातून उपचार पूर्ण करून बाहेर पडलेल्या, परंतु समाजातील आप्तस्वकीयांकडून नाकारलेल्या आणि मनोरुग्ण म्हणून हेटाळणी सहन करणाऱ्या निराधार रुग्णांना आश्रय देण्याचे निस्वार्थ कार्य करीत आहे. या संस्थेला ॲग्रीकोज वेलफेअर सोसायटीकडून मागील वर्षीही आश्रितांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शन संच भेट देण्यात आला होता.

सभेत ७५ वर्षे पूर्ण केलेल्या विविध क्षेत्रातील १२ कृषी तज्ञांचा अमृत महोत्सवी सत्कार शाल, श्रीफळ, आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.ॲग्रीकोज वेलफेअर सोसायटी ही संस्था नागपूर कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची असून, कृषी, शैक्षणिक संस्था, महसूल, पोलीस, सहकार, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी विविध सरकारी/निमसरकारी विभागातून सेवानिवृत्त झालेल्यांची आहे. सेवानिवृत्तीनंतर सामाजिक बांधिलकीतून शेतकरी वर्गाला शेतीविषयक मार्गदर्शन, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचे कार्य संस्था करते.

*श्री विजय तपाडकर* सचिवांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तर *श्री सुभाष पानसे* उपाध्यक्षांनी पुढील वर्षासाठीच्या प्रस्तावित उपक्रमांची माहिती दिली. *संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी सरोदे* यांनी समारोप भाषणात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कृषी विकासातील कार्याचा गौरव करत, त्यांना *भारतरत्न* देण्यात यावा, असा ठराव मांडला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन *श्री राजेश कळमकर* यांनी केले, तर आभार प्रदर्शन *श्री विजय गोलीवार* यांनी केले. सभा यशस्वी करण्यासाठी *श्री गंगाप्रसाद ग्वालबंशी, प्रमोद पांढरे, रामदास ठाकरे* आदींचे विशेष योगदान लाभले.