
अमरावती – अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील स्वयंघोषित गुरुदासबाबा उर्फ सुनील कावलकर याने मध्य प्रदेशातील एका भक्त महिलेवर तीन महिने अत्याचार करून मोबाइलमध्ये अश्लील चित्रफीत बनविली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांत गुरुदासबाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या पतीला व्यसनाधीनतेतून मुक्त करण्यासाठी जबलपूर येथील ३४ वर्षीय महिला २ मे २०२३ रोजी बाबाच्या मार्डी येथील आश्रमात आली होती. पतीला व्यसनमुक्त करण्यासाठी पुढील काही महिने आश्रमातच मुक्कामी राहावे लागेल, असे तिला सांगण्यात आले. तिने आश्रमात राहण्याची तयारी दर्शवली. यादरम्यान तीन महिन्यांपर्यंत भोंदूबाबाने तिच्यावर सतत अत्याचार करून लैंगिक शोषण केले. लग्नाचेही आमिष दाखविले आणि या दुष्कृत्यानंतर तो फरार झाला. एक दिवस महिलेला मोबाइलमध्ये त्याने केलेल्या दुष्कृ्त्याची चित्रफीत दिसली. तिने जाब विचारला असता, गुरुदासबाबाने दमदाटी करून धमकावले व २ जानेवारीला तिला नागपूरला सोडून तो फरार झाला.
काही महिन्यांपूर्वी याच भोंदू सुनील कावलकरने गरम तव्यावर बसून लोकांच्या समस्या सोडवित असल्याचा व्हिडीओ जारी केला होता. त्याबाबत चौकशी होताच चारधामच्या बहाण्याने तो पसार झाला होता. यादरम्यान महिलेवर अत्याचार करून तो पुन्हा फरार झाला आहे. पहिल्या प्रकरणातच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुरुदासबाबावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हाच त्याच्या मार्डी आश्रमातून कुऱ्हा पोलिसांनी अटक का केली नाही, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.