आमदार रवींद्र वायकरांवर गुन्हा दाखल

0

मुंबई : खैलाच्या मैदानासाठी आरक्षित मुंबई महापालिकेच्या भूखंडावर आलिशान हॉटेल बांधल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रीगचा गुन्हा दाखल केला आहे. वायकर यांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (ED booked Ravindra Waikar) गेल्याच आठवड्यात वायकर यांची व त्यांच्या पत्नीची आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती.
वायकर आणि इतर पाच जणांवर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) गेल्या महिन्यात गुन्हा दाखल केला होता. याच एफआयआरच्या आधारे ईडीनं मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे. तक्रारीनुसार, मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी येथील भूखंडावर वायकर यांनी आलिशान हॉटेल बांधल्याचा आरोप आहे. राजकीय दबाव वापरून त्यासाठी वायकर यांनी मान्यता मिळवली होती. याद्वारे वायकर यांनी बीएमसीचे सुमारे पाचशे कोटींचे नुकसान केल्याचा आरोप आहे. या भूखंडावर क्रीडा विषयक उपक्रम राबविण्याचा करार वायकर यांनी महापालिकेसोबत केला होात. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना ही परवानगी देण्यात आली होती. मात्र, भूखंडाचा वापर हॉटेल उभारण्यासाठी झाला. याच प्रकरणात ईडीनं त्यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर, व्यावसायिक भागीदार आसू निहलानी, राज लालचंदानी, प्रितपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या वतीने आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.