

अकोला (Akola), 19 जुलै
गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी कागदपत्रे कृषी विभागाला अनेकदा मागणी करूनही सादर केली नाही. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिले. या प्रकरणात आता विमा कंपनी एचडीएफसी अर्गो’च्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य प्रतिनिधी प्रकाश श्रीवास्तव आणि विभागीय प्रतिनिधी सुनिल भालेराव यांच्यावर गुन्हे दाखल केले.
पंतप्रधान पीक विमा योजनेत (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) सहभागी होण्यासाठी आता एक रुपये भरून सहभागी होता येते. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी 2023-24 या वर्षात सहभाग घेतला होता..मात्र अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले.
पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दावा यादी, सर्वेक्षण झालेली यादी तसेच पात्र आणि अपात्र याची कारणासह यादी, खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानीचे पंचनामे प्रती इतर दस्ताऐवज सादर न केल्याने अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील 7 हजार 556 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा योग्य परतावा मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा कृषी अधिक्षक शंकर किरवे यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीक विम्याचा परतावा शेतकऱ्यांना मिळाला नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. अखेर याप्रकरणी आता बाळापूर पोलिसांनी पीक विमा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल केले आहेत.
आमदार देशमुख यांनी केले होते आंदोलन!
अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे आज पीकविमाच्या मागणीवरून चांगलेच आक्रमक झाले होते. आमदार देशमुख यांनी बाळापूरचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना नगरपालिकेतच कोंडले. हा प्रकार काल घडला. आमदार नितीन देशमुख यांनी विमा कंपन्यांच्या तक्रारीविरोधात नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी गैरहजर राहिले. त्यामुळे आमदार नितीन देशमुखांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं होतं. अनुपस्थित अधिकारी आल्याशिवाय कुणालाच आतून सोडणार नाही असा पवित्रा आमदार नितीन देशमुख यांनी घेतला होता. त्यानंतर बैठक घेऊन आंदोलन मागे घेण्यात आले.