अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे १०० वे विभागीय नाट्य संमेलन

0

२४ एप्रिलपासून नागपुरात

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते उद्घाटन तर नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते समारोप
व्यावसायिक नाटक, एकांकिका स्‍पर्धा, लोककला आदी भरगच्‍च कार्यक्रम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनाचे हे वर्ष आहे. महाराष्ट्रात सर्वत्र हे नाट्य संमेलन विभागीय स्‍तरावर अतिशय जल्लोषात आणि आनंदात संपन्न होत आहे. नागपूर विभागाचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १०० वे नाट्य संमेलन येत्‍या, २४ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्‍यक्ष व प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
या संमेलनात व्यावसायिक नाटक, लोककलेवरील कार्यक्रम, स्थानिक शाखेचे व कलावंतांचे सादरीकरण तसेच बाल कलावंतांची विशेष प्रस्तुती असणार आहे.


रात्रकालीन एकांकिका स्‍पर्धा

अखिल भारतीय मराठी नाट्य १०० वे विभागीय मराठी नाट्य संमेलना निमित्त डॉ. गिरीश गांधी यांच्या गौरवार्थ २४ एप्रिल २०२५ रोजी रात्रकालीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ‘हास्यजत्रा’ या मालिकेचे सुप्रसिद्ध कलावंत हेमंत पाटील हे करणार आहेत तर २५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६ वाजता ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतील सुप्रसिद्ध कलावंत श्री. भारत गणेशपुरे यांच्या हस्ते स्‍पर्धेचे बक्षिस वितरण होईल. त्‍यानंतर सकाळी ९ वाजता ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते श्री. देवेंद्र दोडके यांच्या हस्ते नाट्य संमेलनानिमित्त उभारण्यात येणाऱ्या रंगमंचाचे पूजन होणार आहे.


नाट्यदिंडीत प्रसिद्ध कलावंतांचा सहभाग

२६ एप्रिल सकाळी ७ वाजता शिवाजी पुतळा, गांधी गेट, महाल, नागपूर येथून नाट्यदिंडीला सुरुवात होईल. नाट्य दिंडीत सुमारे ९०० कलावंतांचे सादरीकरण होणार आहे. महाराष्ट्रातील लोककलावंत लोककला सादर करतील. महाराष्ट्रातील नाटक, मालिका आणि चित्रपटातील सुप्रसिद्ध कलावंत प्रशांत दामले, भाऊ कदम, अजित भुरे, डॉ. जब्बार पटेल, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, शलाका पवार, विजय गोखले, विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी आणि मोहन जोशी यांसारखी नामवंत कलावंत मंडळी यांची उपस्थिती असणार आहे. असंख्य रसिक तसेच प्रेक्षकांची हजेरी असणार आहे.

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते उद्घाटन

२६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला नागपूर शहराचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री मा. श्री. उदय सामंत राज्यमंत्री मा. श्री. आशिष जयस्वाल, स्थानिक आमदारांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री प्रशांत दामले आणि १०० व्या नाट्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आणि सुप्रसिद्ध चित्रपट कलावंत यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

दुपारी १२ वाजता श्री. भाऊ कदम यांचे ‘सीरिअल किलर’ हे व्यावसायिक नाटक सादर होणार आहे. दुपारी ३ वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगर १ या शाखेचे विदर्भाचा इतिहास सांगणारे ‘सारस्वतीजन्मभूः’ हे नाटक सादर होणार आहे. दुपारी ५ वाजता ‘आजचे नाटक’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादात सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले, विजय केंकरे, अजित भुरे, चंद्रकांत कुलकर्णी, पराग घोंगे अश्या मातब्बर मंडळींचा सहभाग असणार आहे. संध्याकाळी ६ वाजता महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा मराठमोळा कार्यक्रम सादर होणार आहे.

‘झाडीपट्टी’ चे रंग

२६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता महाराष्ट्राच्या पूर्वेकडील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या पूर्व वैदर्भीय जिल्ह्यात झाडीपट्टी रंगभूमीची सांस्कृतिक परंपरा सांगणारा आणि लोककलेला जिवंत ठेवणा-या झाडीपट्टीच्या रंगभूमीची स्वतंत्र ओळख करून देण्याच्या दृष्टीने… ‘शतकोत्तर झाडीपट्टी’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात सुमारे १५० कलावंतांचे सादरीकरण होणार असून झाडीपट्टी रंगभूमीवरील १५ समूह यात सहभागी होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते समारोप

२७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता बालरंगभूमी परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालकलाकारांचे आणि दिव्यांग मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून दुपारी १२ वाजता नागपूर शाखेतर्फे संपन्न झालेल्या १०० नाट्य संमेलनावर प्रकाश टाकणारा ‘शतकीय संमेलनाची वारी’ ही नाट्यधारा सादर होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता दंडार, तमाशा, आणि खडीगंमत यासारखे लोककलेचे कार्यक्रम सादर होणार आहेत.

संध्याकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री, भारत सरकार, नागपूर शहराचे सन्माननीय खासदार श्री. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली १०० व्या विभागीय मराठी नाट्य संमेलनाचा समारोप सोहळा संपन्न होणार आहे. या समारोप सोहळ्याला बालरंगभूमी परिषद मुंबईच्या अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेत्री ॲड . नीलम शिर्के सामंत तसेच स्थानिक आमदार आणि मातब्बर कलावंत प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे.

समारोप सोहळ्यानंतर लगेचच ७ वाजता ‘हीच खरी फॅमिलीची गंमत’ हे अतिशय गाजलेले मुंबईचे व्यावसायिक नाटक सादर होणार आहे. या नाटकात शलाका पवार व संतोष पवार आणि सागर कारंडे या सुप्रसिद्ध कलावंतांची भूमिका असणार आहे. नागपूर आणि विदर्भातून कलाक्षेत्रात मुंबई नगरीत स्वतःची स्वतंत्र ओळख करून देणाऱ्या कलावंतांचा आणि झाडीपट्टी रंगभूमीची अविरत सेवा करणाऱ्या कलावंतांचा सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे.
असा दैदिप्यमान आणि अभूतपूर्व नाट्‌य संमेलनाचा सोहळा नागपूर शहरात संपन्न होणार आहे. न भूतो न भविष्यती अशा या सोहळ्याचे आपण साक्षीदार असणार आहोत.
…….
पत्रकार परिषदेला उपस्थिती
१) श्री. प्रशांत दामले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद.
२) श्री नरेश गडेकर केंद्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद.
३) श्री. अजय पाटील अध्यक्ष – नागपूर शाखा
४) श्री सलीम शेख अध्यक्ष – नागपूर उपनगर १
५) श्री. संजय रहाटे कार्यकारीणी सदस्य, मुंबई

6)किशोर आयलवार