

ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर आंबोणे यांना जीवनगौरव पुरस्कार
नागपूर (Nagpur), 12 एप्रिल
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेचा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, 14 एप्रिल रोजी सायंकाळी 5.00 वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक व माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे भूषवतील. श्रीमंत राजे मुधोजी भोंसले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. याप्रसंगी अ. भा. मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे उपक्रम उपाध्यक्ष भाउसाहेब भोईर यांची प्रमुख उपस्थिती राहील.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात संपूर्ण हयात रंगमंचावर घालविणारे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते प्रभाकर आंबोणे यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप राहील. तसेच ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक किशोर आयलवार यांना ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेत्री सीमा गोडबोले यांना श्रेष्ठ रंगकर्मी, रोशन नंदवंशी यांना रंगसेवा पुरस्कार, प्रा. राजकुमार मुसणे ( गडचिरोली ) यांना नाट्य समीक्षा पुरस्कार, चंद्रकांत चौधरी यांना सर्वोत्कृष्ट नाट्य लेखक, सुनील तितरे यांना सर्वोत्कृष्ट रंगकर्मी रंगधर्मी, रागिणी बिडकर आणि संतोष वरपल्लीवार उर्फ संतोष कुमार यांना झाडीपट्टी रंगभूमी-ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार देण्यात येणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2024-25 मध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या विविध कलावंतांना सन्मानित करण्यात येईल. त्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री भावना चौधरी, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून यशवंत चोपडे, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना प्रणव कोरे , सर्वोत्कृष्ट नेपथ्य असिधारा लांजेवार तसेच हिंदी राज्य नाट्य स्पर्धा अंतिम फेरीत पुरस्कार प्राप्त पुण्यशील लांबट, रश्मी लांडे, रोशनी सेलोकार, साक्षी नायगावकर, अक्षय गुल्हाने, मनीष चौधरी आणि बालनाट्य स्पर्धा अंतिम फेरीत रौप्यपदक प्राप्त व्यंकटेश माकडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
रसिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि नागपूर शाखेचे प्रमुख कार्यवाह नरेश गडेकर तसेच समस्त कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.