

मुंबई (Mumbai), 7 एप्रिल, – निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून, मतदानामुळे लोकशाही बळकट होते. आपल्या देशाचे आपण जबाबदार नागरिक आहोत म्हणून आपण प्रत्येकाने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे आम्ही स्वतः मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार आहे. तेव्हा तुम्ही ही या आणि सक्षम लोकशाही घडविण्यात आपलं योगदान द्या, असे आवाहन जिल्ह्यातील जोगेश्वरी पूर्व, मतदार संघातील 95 वर्षाचे ज्येष्ठ मतदार मनोहर दानवे आणि 84 वर्षाच्या सुलोचना गवळी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहभाग घेता यावा यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्या समन्वयाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात घरोघरी जावून जनजागृती करण्यात येत आहे.
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी घरोघरी जनजागृती
आज मुंबई उपनगर जिल्ह्यातील रायडोंगरी बोरीवली पूर्व, दहिसर, मलाड, अणूशक्तीनगर, जोगेश्वरी पुर्व इत्यादी ठिकाणी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत घरोघरी माहिती देतांना जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदार, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन मतदार हेल्पलाइन अॅप (voters.eci.gov.in) आणि सक्षम (Saksham-ECI) ॲपच्या सहाय्याने आपले नाव यादीत आहे किंवा नव्याने नाव नोंदणी कशी करावी, याबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. तसेच स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान अंतर्गत काम करणाऱ्या स्थानिक सामाजिक संस्थेच्या सफाई मित्रांच्या मार्फत आणि आरोग्य सेविका व आशा सेविका यांच्या मदतीने स्थानिक नागरिकांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी ‘मी मतदान करणार’ अशी प्रतिज्ञा घेऊन संकल्प केला.