


चंदीगड(Chandigarh), 18 मे हरियाणाच्या नूंहमध्ये आज, शनिवारी पहाटे प्रवासी बसला आग लागून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 24 जण गंभीररित्या भाजले आहेत. अपघाताच्या वेळी या बसमध्ये 60 लोक प्रवास करीत होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार हे सर्व प्रवासी एकमेकांचे नातेवाईक असून ते धार्मिक यात्रेसाठी बसने फिरायला निघाले होते. यातील बहुतांश लोक लुधियाना आणि होशियारपूरचे रहिवासी आहे. उत्तरप्रदेशातील मथुरा आणि वृंदावन येथे देवदर्शन केल्यानंतर माघारी परतताना कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेस-वे वर मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास बसने अचानक पेट घेतला. काही वेळेतच आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेच्यावेळी बहुतांश प्रवासी झोपेत असल्यामुळे त्यांना सावरायला देखील वेळ मिळाला नाही. यात 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण गंभीररित्या होरपळले आहेत. या सर्व जखमी प्रवाशांना मेडिकल कॉलेज नलहड नूंहमध्ये दाखल करण्यात आले आहे.