काँग्रेस बंडखोरांसह 9 आमदार भाजपात

0

शिमला (Shimla) 23 मार्च  : हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे अपात्र ठरलेल्या 6 माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत 3 अपक्ष आमदारांनीही कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतलाय.

हिमाचल प्रदेशातील सातत्यानं वाढत असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक माजी आमदार भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशा परिस्थितीत आता काँग्रेसचे सहा माजी आमदार आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपच्या तिकिटावर ते येथून पोटनिवडणूक लढवू शकतात, असंही सांगण्यात येत आहे.सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र राणा, इंदर दत्त लखनपाल, चैतन्य शर्मा आणि देवेंद्र कुमार भुट्टो या 6 बंडखोर काँग्रेस आमदारांवर व्हिप न पाळल्यानं 29 फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आली होती.

निवडणूक आयोगानं त्यांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत.आशिष शर्मा, होशियार सिंग आणि केएल ठाकूर या 3 अपक्ष आमदारांनी शुक्रवारी राजीनामे दिले. त्यांच्या मतदारसंघातही पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या 9 आमदारांच्या पाठिंब्याने राज्यातील एकमेव जागेसाठी राज्यसभेची निवडणूक जिंकल्यानंतर गेल्या महिन्यात मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अडचणीत आले होते. परंतु नंतर त्यांच्या सरकारला कोणताही धोका नसल्याची माहिती समोर आली होती.