
बुलढाणा : देशातील ८० कोटी जनता ही ऐतखाऊ आहे. त्यामुळे आता देशातील रेशन व्यवस्था कायमची बंद करून देशाला बलशाली करा, अशी वादग्रस्त मागणी मागणी रयतक्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे. (Sadabhau Khot)
बुलढाणा येथे रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सदाभाऊ खोत आले होते. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. राज्यासह देशातील कोट्यवधी कुटुंबांना रेशनिंग व्यवस्थेचा मोठा आधार आहे. अनेक अर्थतज्ज्ञांकडून सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत करण्याची मागणी केली जात असताना खोत यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सदाभाऊ खोत यांनी थेट भाजपच्या प्रमुख मुद्याला विरोध कसा केला, याची चर्चा सुरू झाली आहे. शेतीवर आधारित फक्त ४० टक्के समाज उरला असून देशात ८० कोटी माणसे आयत खात आहेत. त्यामुळे देशातील रेशन व्यवस्था बंद करून देश बलशाली बनवावा, असे खोत म्हणाले.
खोत म्हणाले, माणसाला फुकटचे खायला मिळणे म्हणजे अफूच्या गोळ्या आहेत. राजकीय पक्षांची चढाओढ लागली आहे. हे फुकट ते फुकट त्यामुळे देश भिकाऱ्यांचा बनत चालला आहे. प्रत्येकाने श्रम करावे श्रमावरच देश बलशाली होईल, असेही खोत म्हणाले.