
मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र पाठवून दिला इशारा
नवी दिल्ली (New Delhi),10 ऑगस्ट : पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा करा. अन्यथा राज्यात प्रस्तावित असलेले 8 महामार्ह प्रकल्प (हाय-वे प्रोजेक्टस)Highway Projects रद्द करावे लागतील असा इशारा केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Highways and Transport Minister Nitin Gadkari)यांनी दिलाय. यासंदर्भात गडकरींनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab Chief Minister Bhagwant Maan)यांना पत्र पाठवले आहे.
दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस वेवर होत असलेल्या हिंसक घटना पाहता गडकरींनी हे इशारा पत्र पाठवले आहे. या 8 प्रकल्पांची एकूण किंमत १४२८८ कोटी रुपये आहे. दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस वेच्या बांधकामादरम्यान अनेक ठिकाणी काम थांबवण्यासाठी हिंसक घटना घडल्या होत्या. राजधानी दिल्ली ते माता वैष्णोदेवी कटरा असा हा एक्सप्रेस वे बनवला जात आहे. त्याचा एक भाग अमृतसरशीही जोडला जाणार आहे. नितीन गडकरी यांनी अभियंते आणि कंत्राटदारांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लुधियानामध्येही एनएचएआयच्या प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली आहे. नितीन गडकरी यांनीही त्यांच्या पत्रात भूसंपादनाचा मुद्दा उपस्थित केला आहे. याशिवाय पुरावा म्हणून त्यांनी या पत्रासोबत हल्ल्याची छायाचित्रेही पाठवली आहेत. मुख्यमंत्र्यांनी थेट हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी म्हंटले आहे. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी ठोस पावले उचलावीत आणि भविष्यात अशा समस्यांना सामोरे जावे लागणार नाही यासाठी एफआयआर नोंदवून दोषींवर कारवाई करावी असे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत.
नितीन गडकरी यांनी महिनाभरापूर्वी महामार्ग प्रकल्पांची आढावा बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्था आणि भूसंपादनाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. गडकरी म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत, उलट परिस्थिती बिकट झाली आहे. ते म्हणाले की, भूसंपादनाच्या प्रलंबित प्रश्नांमुळे अनेक ठिकाणी कंत्राटदारांना लक्ष्य केले जाते. असेच सुरू राहिल्यास महामार्गाचे 8 प्रकल्प रद्द करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. जागा उपलब्ध न झाल्यामुळे एनएचएआयने यापूर्वीच 3 महामार्ग प्रकल्प रद्द केले आहेत.















