नोकरीचे आमीष दाखवून टोळीकडून ६० तरूणांची फसवणूक

0

सोलापूर(Solapur), 2 जुलै :- परदेशात भरपूर पगाराच्या नोक-या मिळवून आमीष दाखवून एका टोळीने बेरोजगार तरूणांना आर्थिक गंडा घालण्याचा चालविलेला उद्योग उजेडात आला आहे. यात ६० तरूणांची फसवणूक झाली असून आर्थिक फसवणुकीची रक्कम ३६ लाख एवढी आहे.

यासंदर्भात सिराज अ. रशीद नदाफ (वय ४०, रा. विद्यानगरजवळ, उत्तर सदर बझार, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सय्यद मसूद ऊर्फ असद गझनफरअली खतीब व त्याचा भाऊ सय्यद गझनफरअली खतीब (रा. कोंडानगर, सोलापूर), सय्यद नावेदहुसेन (रा. माहीम दर्ग्याजवळ, मुंबई) आणि रईस इलाहीबक्ष दलाल (रा. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.सय्यद मसूद ऊर्फ असद गझनफरअली खतीब व त्याच्या साथीदारांनी सोलापुरात अशोक चौकात डायनॕमिक कन्सल्टंन्सी आॕफ मॕन पाॕवर सर्व्हिसेस या नावाचे कार्यालय थाटले होते. या कार्यालयामार्फत परदेशात भरपूर पगाराच्या नोक-यांची संधी मिळवून देण्याचे आमीष दाखवून बेरोजगार तरूणांना भुरळ पाडण्यात आली. या कार्यालयात फिर्यादी सिराज नदाफ यास कन्सल्टंट म्हणून नोकरीवर ठेवण्यात आले होते.