
जागतिक महिला दिनानिमित्त एमटीडीसीचा विशेष उपक्रम
पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र असून महिलांचा या क्षेत्रातील सहभाग त्यांच्या आर्थिक विकासाकरिता एक चांगले साधन ठरू शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांमधे उद्योजकता आणि नेतृत्च गुण विकसित करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असून महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरण दि. १९/०६/२०२३ रोजी जाहिर केले आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जागतिक महिला दिन 8 मार्च चे औचित्य साधून पर्यटक महिलांनी निवास कक्ष ऑनलाईन आरक्षित केल्यास त्यांना त्यात 50% सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सर्व महिला पर्यटकांना, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्टस मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ०१/०३/२०२४ ते ०८/०३/२०२४ या कालावधीत तसेच वर्षभरात इतर २२ दिवस अश्याप्रकारे एकूण ३० दिवस, फक्त ऑनलाईन बुकींगमध्ये ५०% सूट देण्यात येईल.याशिवाय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत महिलांसाठी विविध प्रोत्साहने व सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात-महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे औरंगाबाद पर्यटक निवास, राज्यातील प्रथम पुर्णतः महिला संचालित करण्यात आले आहे.
खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टॉरेंट” पुर्णतः महिला संचालित करण्यात आलेले आहे. पर्यटक निवास नागपूर देखील पुर्णतः महिला संचालित करण्याचा महामंडळाचा मानस असून लवकरच पर्यटक निवास नागपूर हे पुर्णतः महिला संचालित करण्यात येणार आहे.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी, महिला बचत गटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादीच्या विक्रीसाठी स्टॉल / जागा उपलब्ध करून देण्यात येईल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टस मध्ये महिला पर्यटकांसाठी विशेष सुविधा जसे, अपंग किंवा वृध्द महिलांकरीता लिफ्ट जवळच्या खोल्या उपलब्ध करून देणे, महिलांसाठी विशेष खेळ, मनोरंजन कार्यक्रमांचे कक्ष, पर्यटक निवासामधे Sanitary pad vending machine सुविधा, 5 वर्षापर्यंतची मुले असलेल्या महिला पर्यटकांसाठी पाळणाघर इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत. श्री. दिनेश कांबळे, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक, मविम, नागपूर आवाहन केले की, महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि निवास कक्ष आरक्षित करून भरघोस सवलत प्राप्त करावी.पत्रकार परिषदेस पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांची उपस्थिती होती.