
चंद्रपूर CHNDRAPUR -चंद्रपूर-बल्लारशा बायपास मार्गावर रेल्वे उड्डाणपुलावर ट्रक आणि ऑटोरिक्षामध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अष्टभुजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात झाला. ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जाणारा ट्रक शेजारच्या ऑटोरिक्षावर उलटला. यात चार जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. संगीता चाहांदे (वय 56 वर्षे, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22 वर्षे, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि ऑटो चालक इरफान खान (वय 49 वर्षे, रा. बाबूपेठ) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. अपघातामुळे घटनास्थळी सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतप पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.