

गोंदिया (Gondia): दोन वाघांच्या झुंजीत टी-९ वाघाचा मृत्यू झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वीच नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाडेझरी परिसरात घडली होती. या झुंजीत दुसरा वाघदेखील जखमी झाला असून, या वाघाचा वावर सध्या नागझिरा अभयारण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या मंगेझरी, गोविंदपूर, रुस्तमपूर, बुचाटोला, बोदलकासा व कोडोबर्रा या परिसरात आहे. वाघ जखमी असल्याने तो पुन्हा हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात झुंजीत वाघाचा मृत्यू झाल्यानंतर दसरा वाघसन्दा गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या जखमी वाघाचा शोध गेल्या तीन चार दिवसांपासून वन व वन्यजीव विभागाची चमू घेत आहे. तिरोडा तालुक्यातील जंगलाचा बराच भाग हा नवेगावबांध- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. त्यामुळे जखमी वाघाने आपले बस्तान आता या परिसरात मांडले आहे. सध्या या वाघाचा वावर मंगेझरी, गोविंदपूर, रुस्तमपूर, बुचाटोला, बोदलकासा व कोडोबर्रा या परिसरात आहे.
या भागातील अनेकांना या वाघाचे दर्शनसुद्धा झाले आहे. या जखमी वाघाने या परिसरातील दोन-तीन गावांत जनावरांची शिकारसुद्धा केल्याची माहिती आहे. जखमी वाघाचा वावर याच परिसरात असल्याने या भागातील गावक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे वन विभागाच्या चमूची नजर यासंदर्भात नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे वनक्षेत्राधिकारी विलास भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जखमी वाघाचा वावर या परिसरात असल्याच्या बाबीला दुजोरा दिला. तसेच या वाघावर वन विभागाची चमू नजर ठेवून आहे. कॉलर आयडी, पगमार्कवरून वाघाचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनीसुद्धा रात्रीच्या वेळेस एकटेदुकटे घराबाहेर पडू नये, सतर्कता बाळगावी, असे सांगितले. टी-४ वाघिणीच्या बछड्याचा झुंजीत मृत्यू नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील टी-४ वाघिणीच्या एका बछड्याचा सोमवारी मृत्यू झाला. या बछड्याच्या अंगावर जखमा असल्याने हा घातपात तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, या बछड्याचासुद्धा झुंजीतच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. पांगळी परिसरात आले दोन नवीन पाहुणे • गोंदिया तालुक्यातील पांगडी जलाशय परिसरात दोन वाघिणी सध्या दाखल झाल्याची माहिती आहे. या वाघिणींचे लोकेशनसुद्धा वन्यजीव विभागाने ट्रेस केले आहे. तर या परिसरात असलेला एक वाघ नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात परत गेल्याची माहिती आहे.