
नागपूर.(nagpur)कोरोना संकटाने (Corona crisis ) सर्वांवरच आघात केला. पण, बंदीवांनांसाठी मात्र हे संकट सुकाळ ठरले. मोठ्या संख्येने बंदीवानां पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले होते (prisoners were released on parole). कोरोनानंतर बंदीवानांना परतण्यास सांगण्यात आले. पण, 4,253 पैकी अजूनही 350 कैदी फरारच आहेत (350 prisoners are still absconding). सर्वोच्च न्यायालयाने या कैद्यांना शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच तुरुंग प्रशासनाने फरार झालेल्या कैद्यांवर राज्यभर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यात 291 पेक्षा अधिक गुन्हे दाखल केल्याची माहिती पुढे येत आहे. फरार कैद्यांपैकी अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल असून जन्मठेप झालेल्या कैद्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. जानेवारी 2023 अखेर फरार कैद्यांपैकी 8 जण स्वत:हून तुरूंगात दाखल झाले. तर 19 जणांना पोलिसांनी पकडून परत आणल्याची माहिती अहवालात दिली आहे.
कोरोना संकटाच्या काळात कोरोना संसर्गाने कारागृहांमध्ये शिरकाव केला होता. पूर्वीच प्रत्येकच तुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. कोरोना काळात कैद्यांनाही कोरोना होण्याचा धोका लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने कच्च्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यातही गुन्हेगारांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. कोरोना संपल्यावर त्यांना तुरुंगात रिपोर्ट करायचा होता. परंतु, अनेक जण आले नाही. तुरूंग प्रशासनाने संपूर्ण यादी घेत सर्व संबंधित पोलिस ठाण्यांना पकडण्यास सांगितले. आतापर्यंत 19 जणांना अटक करून त्यांना पुन्हा कारागृहात पाठवले आहे. राज्यात लहानमोठे असे एकूण 60 कारागृह असून या सर्व कारागृहात सध्याच्या घडीला न्यायबंदी आणि शिक्षा झालेले मिळून 43,046 कैदी आहेत. कोरोनाच्या काळात कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी न्यायबंदी असलेल्या कैद्यांना तात्पुरता जामीन तसेच शिक्षा झालेल्या कैद्यांना तत्कालीन संचित रजा मंजूर करण्यात यावी असे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले होते. कारागृह प्रशासनाने कोरोनाच्या काळात 4 हजार 253 शिक्षा झालेल्या कैद्यांना संचित रजेवर पाठवले होते. कारागृह प्रशासनाने राज्यातील विविध पोलीस ठाण्यात 291पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले असून 52 जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कारागृह प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिली आहे.