
बागला चौकातील ‘त्या’ वादग्रस्त रस्ता दुभाजका विरोधात जनविकास सेना आक्रमक
चंद्रपूर(Chandrapur) :बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय दरम्यान बांधण्यात येणाऱ्या वादग्रस्त रस्ता दुभाजकाविरोधात जनविकास सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. जीवघेणे खड्डे असलेल्या या रस्त्यावर दुभाजक नव्हे तर तात्काळ रस्त्याचे बांधकाम करण्याची नागरिकांची मागणी आहे. केवळ कंत्राटदाराच्या हितासाठी 3.56 कोटी रूपयांचे दुभाजक करण्याचा घाट मनपा प्रशासनाने घातला. त्यामुळे नागरिकांची मागणी व गरजेनुसार या ठिकाणी सुरू असलेले रस्ता दुभाजकाचे काम तातडीने रद्द करावे, या कामाची चौकशी करून निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार करणारे तत्कालीन आयुक्त विपिन पालीवाल,मनपाचे इतर अधिकारी तसेच कंत्राटदार मे. सुर्यवंशी इंटरप्राईजेस व मे. काहाळे इन्फ्राॅकाॅन प्रा.लि. यांची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी अशा मागणीचे पत्र मनपाचे आयुक्त यांना दिले. यावेळी जनविकास सेनेचे इमदाद शेख,महिला आघाडीच्या मनिषा बोबडे तसेच अक्षय येरगुडे,प्रफुल बैरम व नकुल मुसळे उपस्थित होते.
रस्ता दुभाजकाचे काम रद्द करून 3.56 कोटी रुपये निधीतून या ठिकाणी नागरिकांची मागणी व गरजेनुसार नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी जनविकास सेनेने केली आहे.या मागणीसाठी जनविकास सेनेतर्फे बुधवार दि.29 ऑक्टोबर रोजी दुभाजकाचे काम बंद पाडण्यात येणार आहे. तसेच पुढील काळात या ठिकाणी जीवघेणा अपघात झाल्यास मनपाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येईल असा इशारा जनविकास सेनेने दिला आहे.
















