

– ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’ मध्ये दोन विक्रमांची नोंद
– ईश्वर देशमुख महाविद्यालयाचे पटांगण विविध रंगानी फुलले
– खासदार सांस्कृतिक महोत्सवाने पेरले संस्काराचे बीज
नागपूर (Nagpur) :- खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित जागर भक्तीचा या उपक्रमात शुक्रवारी सकाळी शहरातील 175 शाळांमधील तब्बल 28,329 विद्यार्थ्यांनी समर्थ स्वामी रामदासांचे 51 ‘मनाचे श्लोकां’चे पठन आणि वंदे मातरम गायन करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या दोन्ही विक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’ मध्ये नोंद करण्यात आली. बालमनाला संस्कारित करण्याचा, त्यांचे व्यक्तिमत्व विकसीत करून सुदृढ मानसिकेतची पिढी घडवण्याचा नवा पायंडा यानिमित्ताने खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने घालण्यात आला.
हनुमान नगर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे भव्य पटांगण विविधरंगी शालेय पोशाख परिधान केलेल्या शहरातील 175 शाळांमधील छोट्या विद्यार्थ्यांनी फुलून गेले होते. सकाळी 7 वाजेपासून विद्यार्थी कार्यक्रमस्थळी यायला सुरुवात झाली. 8 वाजेपर्यंत 230 बसेसमधून हजारो विद्यार्थी पटांगणावर उतरले. त्यांच्यासोबत शिक्षक, मुख्याध्यापक, शाळासंचालकदेखील मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी पोहोचले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सह-बौद्धिक प्रमुख लीना गहाणे, संस्कार भारतीच्या प्रमुख कांचन गडकरी, मृणाल पानसे, वसुधा खटी यांच्याहस्ते पारंपरिक पद्धतीने दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला रीतसर सुरवात करण्यात आली.
बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित राष्ट्रीय गीत ‘वंदेमातरम्’ या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने एकाच ठिकाणी एकावेळी सर्वाधिक 28,329 विद्यार्थ्यांनी वंदेमातरम् हे गीत सादर करून नवा किर्तीमान स्थापित केला. त्यानंतर स्वामी समर्थांच्या 51 मनाचे श्लोकचे विद्यार्थ्यांनी पठण करीत आणखी एका जागतिक विक्रमाची नोंद केली.
वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी रेणू अग्रवाल, नचिकेत जामदार, तसेच धनवटे नॅशनल कॉलेजचे जनसंचार विभाग प्रमुख नितीन कराळे, ईशा बांगडकर, शुभ उपवंशी, ऋषी पहाडे यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’च्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर यांच्या हस्ते सर्टिफिकेट आणि मेडल प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले तर योगेश बन यांनी आभार मानले.
प्रास्ताविकातून खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यानी या उपक्रमामागची भूमिका विशद केली.या उपक्रमाचे संयोजक विजय फडणवीस, अनिल शिवणकर, योगेश बन, नरेश कामडे, हरीश केवटे, किशोर बागडे व विश्वनाथ कुंभलकर होते. कार्यक्रमाला प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, जयप्रकाश गुप्ता, प्रा. राजेश बागडी, डॉ. गौरीशंकर पाराशर, बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, अविनाश घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, संजय गुळकरी, रेणुका देशकर, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांची उपस्थिती होती.