उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये २३ महिलांसह २७ जणांचा मृत्यू

0

उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) २ जुलै :- उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत २३ महिलांसह २७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये ३ चिमुकल्यांचादेखील समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

यासंदर्भात बोलताना, हाथरसचे पोलीस अधिक्षक राजेश कुमार सिंह(Rajesh Kumar Singh) म्हणाले, आम्ही आतापर्यंत २७ जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. यामध्ये २३ महिला, ३ चिमुकली मुले आणि एका व्यक्ती समावेश आहे. तसेच जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात येत असून ही घटना नेमकी कशी घडली, यांसदर्भातील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हाथरस येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या ठिकाणी बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना उपचारकरिता रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले पुढे बोलताना, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी आणि संदीप सिंह हे दोघेही घटनास्थळी जाण्यासाठी रवाना झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. याशिवाय ही घटना नेमकी कशी घडली, याची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.