चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षात २५ लोकांचा बळी

0
25 people killed in human-wildlife conflict in Chandrapur district

मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एआय (AI) युक्त कॅमेऱ्यांची नजर

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारचे उत्तर

 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून, गेल्या सात महिन्यांत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १०८ लोक जखमी झाले आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दिलेल्या उत्तरातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध उपाययोजना केल्याचा दावा केला आहे. यात मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एआय (AI) युक्त कॅमेरे बसवणे, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील गावांमध्ये तातडीच्या मदतीसाठी प्राथमिक प्रतिसाद गट (Quick Response Teams) तयार करणे, तसेच जंगली जनावरांच्या हल्ल्यातील पीडितांना वेळेवर आर्थिक सहाय्य देणे यांचा समावेश आहे. मात्र, या उपाययोजना सुरू असतानाही मृतांचा आणि जखमींचा वाढता आकडा पाहता, या उपाययोजना किती प्रभावी ठरत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या गंभीर समस्येवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनीही ठोस आणि परिणामकारक पाऊले उचलणे अपेक्षित असताना, केवळ कागदोपत्री उपाययोजनांची माहिती देऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा सूर उमटत आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत, मानवी जीवनासाठी धोकादायक ठरलेल्या वन्य प्राण्यांच्या शिकारीची परवानगी देण्याचा अधिकार राज्याच्या मुख्य वन्यजीव रक्षकांना असला, तरी या अधिकाराचा वापर करून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी तातडीने कठोर निर्णय घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा उपयोग सौर कुंपणे आणि भौतिक अडथळे उभारण्यासाठी होत असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष परिस्थितीत हे अडथळे वन्यप्राण्यांना रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.