

तो काळाकुट्ट कालखंड भोगलेली पिढी आता सत्तरी पार पोहचली आहे..काही वर्षांनी ती अस्तंगतही होईल.त्या यातनापर्वात हजारो लोक तुरुंगात डांबले गेले.हजारो भूमिगत झाले.हजारोंच्या नोकऱ्या गेल्या.आर्थिक विपन्नावस्थेने अनेक कुटुंब नेहमीसाठी उध्वस्त झाली. हुकूमशाहीच्या वरवंट्यात सारा देश पिचल्या गेला. देशाच्या या दुसऱ्या स्वातंत्र्यलढयात, लोकशाही बचाव आंदोलनात सर्वात अग्रणी होते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक.
आज सांगितले तर आश्चर्य वाटेल,पण त्यावेळी सरकार विरोधी आंदोलन तर खूप दूर साधे विरोधी बोलणेही संबंधिताला थेट कारागृहात घेऊन जायचे.आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी तर संपूर्ण सरकारी नियंत्रणात होतीच पण सारी वर्तमानपत्रेही रोज तपासून घेतली जात.त्यातील सरकार विरोधी बातम्या,मजकूर,लेख काढून टाकल्या जात.बाणेदार वर्तमानपत्र ती जागा तशीच मोकळी ठेऊनच अंक प्रकाशित करीत.आज समाज माध्यमातून सरकार विरोधात वाट्टेल ते आणि वाट्टेल तेवढे लिहिता बोलता येते. वर्तमानपत्रातून थेट पंतप्रधानांवर दुगाण्या झाडता येतात. या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे श्रेय त्या काळया कालखंडात स्वतःचे आयुष्य पणाला लावून संघर्ष करणाऱ्या लोकांचे आहे. अभूतपूर्व ,शांततापूर्ण जनआंदोलनाने मस्तवाल हुकूमशाहीचा पाडाव करून देशात लोकशाही पुन:स्थापित केली. आमच्या घरातील आजोबा, मामा, काका अश्या ३ लोकांनी आणीबाणी विरोधात कारावास भोगला.त्यांच्याकडून त्या अन्यायपर्वाच्या अनेक कथा कळत गेल्या. तो सारा इतिहास लिखित स्वरूपात समाजासमोर येणे आवश्यक आहे.
त्याही वेळी आणीबाणीचे समर्थन करणारी आणि सरकारी लांगुलचालन करणारी लोचट मंडळी होतीच. त्यावेळी भ्याडपणे मूग गिळून बसलेली, लोकतंत्राच्या हत्येवर ब्र ही न काढणारी मंडळी आज असहिष्णूतेची आणि कथित आणीबाणीची हाकाटी पिटत आहेत.ज्याला जे वाटेल ते,वाट्टेल तिथे, वाट्टेल त्या पद्धतीने जो तो लिहितो ,बोलतो आहे..तरीही “त्यांना” अभिव्यक्तीचा संकोच कुठे आणि कसा दिसतो आहे देव जाणे !!
मी म्हणतो आणि मांडतो तेच खरं हे तुला मान्य करावेच लागेल ही आक्रस्ताळी दादागिरी हीच त्यांची “अभिव्यक्तीची ” व्याख्या असावी बहुदा..!
असो..आणीबाणी विरोधी संघर्ष हा सामान्य भारतीय जनतेचे लोकशाहीच्या रक्षण आणि पवित्र्यासाठीचे एक देदीप्यमान पराक्रम पर्व आहे. त्यासाठी त्याग केलेल्या सर्व ज्ञात अज्ञात लोकतंत्रसेनानींना अभिवादन !
-आशुतोष अडोणी