

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने टोकाचे पाऊल
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातील 22 दिवसाच्या बाळाला गावातील भोंदूबाबा (भूमका) ने गरम विळा तापवून 65 वेळा चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा अतिदुर्ग मेळघाटा अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे 22 दिवसीय बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला नातेवाईकांनी सिमोरी गावावरून हातरू प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले होते. मात्र, बाळाची गंभीर प्रकृती पाहता येथून या बाळाला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात रेफर केले आहे.
सध्या या बाळावर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार सुरू आहे. बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून बाळाच्या नातेवाईकाने भोंदू बाबाकडे नेऊन बाळाला गरम चटके दिले, बाळाच्या हृदयाला श्वास घ्यायला त्रास होतो, त्याची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, या घटनेने मेळघाटातील आदिवासींचा अजूनही आरोग्य यंत्रणेवर विश्वास नसल्याचं स्पष्ट होत असून, मेळघाटातील आदिवासी अजूनही अंधश्रद्धेच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे.