

नागपूर,(Nagpur)
07 ऑक्टोबर : नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर
आज, सोमवारी पहाटे एका मनोरुग्णाने केलेल्या हल्ल्यात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहे. मृतांपैकी एक जण तामिळनाडूचा रहिवासी असून दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
यासंदर्भात रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरातील मुख्य रेल्वे स्थानकावरील फलाट क्र. 7 वर पहाटे 3.30 वाजता काही प्रवासी गाडीच्या प्रतीक्षेत झोपले होते. त्यावेळी रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजुला (कॉटन मार्केट परिसरातून) अचानक एक वेडसर इसम हातात लाकडी राफ्टर घेऊन आला. तसेच फलाटावरील दिसेल त्याला मारण्यास
सुरुवात केली.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे प्रवासी गोंधळून गेले. यावेळी काही प्रवाशांनी पळ काढून स्वतःची सुटका करून घेतली. परंतु, या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेत. मृतकांमध्ये गणेश कुमार डी (वय 54, दिंडीगुल-तामिळनाडू) यांचा समावेश आणि तर दुसऱ्या मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही. याहत्याकांडानंतर मनोरुग्णाने घटनास्थळाहून पळ काढला. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांनीरेल्वे रुळावर धावत त्याचा पाठलाग करून या माथेफिरूस पकडले.
नागपूर रेल्वे स्थानाच्या समोरील भागाची दुरुस्ती सुरू असल्यामुळे कॉटन मार्केट परिसरातील पूर्वी द्वारातून प्रवाशांची ये-जा सुरू असते. तसेच या भागात गर्दुले, वेडे, भिकारी यांचा मोठा उपद्रव आहे. एकंदरीतच या घटनेमुळे रेल्वे स्थानक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.