

नवी दिल्ली, 19 डिसेंबर : संसद भवन परिसरात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीत भाजप खासदार मुकेश राजपूत आणि प्रतापचंद्र सारंगी जखमी झाले आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्का दिल्यामुळे राजपूत यांचा तोल जाऊन ते अंगावर पडल्यामुळे राजपूत आणि सारंगी दोघेही जखमी झाल्याची घटना घडली.
यासंदर्भात भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी म्हणाले की, मी संसद भवनाच्या पायऱ्यांजवळ उभा होतो. त्यावेळी राहुल गांधींनी खासदार मुकेश राजपूत यांना धक्का दिला. त्यामुळे राजपूत तोल जाऊन प्रताप सारंगी यांच्या अंगावर पडल्यामुळे आपण जखमी झाल्याचे सारंगी यांनी सांगितले. राहुल यांनी धक्का दिल्यामुळे मुकेश राजपूत कोसळल्याने वयोवृद्ध असलेले प्रताप सारंगी खाली कोसळले. या घटनेत प्रतापचंद्र सारंगी यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या डोक्यातून रक्त निघाल्याचे प्रत्यक्षदर्शी खासदाराने सांगितले. दरम्यान पंजाबच्या फरूखाबादचे खासदार मुकेश राजपूत देखील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मुकेश राजपूत यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेय. तर खासदार प्रतापचंद्र सारंगी यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री गिरीराज किशोर यांनी घटनेची निंदा करत आजचा दिवस संसदीय इतिहासातील काळा दिवस असल्याचे म्हंटले आहे. तर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी या घटनेची कठोर निंदा केलीय. संसद हे लोकशाहीचे मंदिर असून इथे गुंडागर्दीला स्थान नसल्याचे रिजीजू यांनी म्हंटले आहे.