

वर्धा (Wardha), 17 ऑगस्ट रेशीम उद्योग (Silk industry) हा शेतीपुरक उद्योग असून कुरझडी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रभाकर मनोहरराव रेवतकर यांनी पारंपारिक शेतीला फाटा फोडून रेशीम उद्योगाकडे वळून रेशीम कार्यालयाच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनात रेशीम उद्योग सुरु केला. या रेशीम उद्योगातुन पहिल्या वर्षातच 2 लाख 8 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले.
प्रभाकर रेवतकर हे अल्पभुधारक पारंपारीक शेती करणारे शेतकरी आहेत. आजपर्यंत ते पारंपारीक शेती पराटी, सोयाबीन, चना थोडाफार भाजीपाला ही पीके घेत होते. बाजार पेठेतील उत्पादीत मालाचे भाव व उत्पादनास येणारा खर्च याचा ताळमेळ कोठेही बसत नव्हता. कोणती शेती करावी या विचारात असतानाच गावातीलच शेतकरी वृषभ रेवतकर हे रेशीम शेती करीत होते रेशीम शेती उद्योग कसा व त्यातुन हमखास मीळणा-या उत्पन्नाची हमी बाबत वृषभ रेवतकर यांचे कडुन माहिती घेतली. त्यानंतर रेशीम कार्यालयास भेट देवुन अधिक माहिती घेतली.
सन 2023-24 या वर्षाकरिता माहे फेब्रुवारी 2023 मध्ये एका एकरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तुती लागवड त्यांनी पुर्ण केली. तसेच माहे मे 2023 मध्ये स्वखर्चानेच पक्के किटक संगोपनगृह बांधकाम पुर्ण करुन माहे जुलै मध्ये 150 अंडीपुंजाची पहिली बॅच घेतली. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. किटक संगोपनामध्ये त्यांच्या आई व पत्नीची सोबत त्यांना मिळाली. पहिल्या बॅच मध्ये रेशिम कार्यालयाचे रेशीम विकास अधिकारी विलास शिंदे व तांत्रिक कर्मचारी रजनी बन्सोड यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली पहिल्याच बॅच मध्ये 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुस-या बॅच ला 100 अंडीपुंजाचे बॅच ला 37 हजार तसेच तिस-या व चौथ्या बॅच ला 200 अंडीपुंजाचे 85 हजार रुपयाचे उत्पन्न झाले. असे पुर्ण वर्षभरात 2लाख 8 हजार रुपयाचे उत्पन्न मीळाले आणि रेशीम उद्योगातुन पहिल्याच वर्षी एका एकरातील रेशीम शेती मधुन ते लक्षाधीश झाले.
रेशीम शेती मध्ये तुतीच्या पाल्यावरच सर्व काही अवलंबुन असल्याने पाला चांगला कसदार असणे आवश्यक आहे. रेवतकर शेतात रासायनिक खताचा वापर करीत नाही. वेळोवेळी शेणखताचा वापर करतात. तुती बागेची मशागत झाडांची छाटणी बॅच कोषावस्थेत गेल्यावर लवकर पाला तयार होऊन पुढील बॅच लवकर घेता येणे शक्य होते. पाल्याची प्रत चांगली असल्यामुळे किटक संगोपनात विशेष काळजी घ्यावी लागत नाही. किटक संगोपनासाठी 10 दिवसाची तयार अळी ज्याला चॉकी म्हणतात ती घेत असल्याने संगोपनाचा कालावधी 30 दिवसावरुन फक्त 20 दिवसांवर आला त्यामुळे 20 दिवसांतच कोष विक्री करुन पैसा हाती येतो.
रेशीम उद्योगामुळे त्यांना दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च सहज भागविणे शक्य झाले असून त्यांचे आर्थिक जीवनमान सुध्दा उंचावले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मधुन पाहिल्याच वर्षी शेड बांधकामाचे, तुती लागवडीची मजुरी, किटक संगोपनाचे साहित्य या सर्व बाबींवर त्यांना आजपावेतो 1 लक्ष 89 हजार 300 रुपये पहिल्याच वर्षी अनुदान मीळाले आहे. रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी रजनी बन्सोड या सुध्दा किटक संगोपनाचे वेळी वेळोवेळी भेटी देऊन किटक संगोपनाविषयी तांत्रिक मार्गदर्शन करीत असल्यामुळे व रेवतकर यांचे सातत्य व जिद्यीचे प्रयत्नामुळे रेशीम कोषाचे उत्पन्न चांगले घेत आहेत. रेशीम उद्योग करुन रेवतकर यांचे कुटुंब खुप समाधानी व आनंदी आहे. कमी मेहनतीचा उद्योग असल्याने शेतक-यांनी किमान एक एकर मध्ये रेशीम उद्योग नक्कीच करावा, असे आवाहन रेवतकर नविन शेतक-यांना करीत आहे.