
(Nagpur)नागपूर-नागपूर जिल्ह्याला भरपूर पावसाची प्रतीक्षा असताना बुधवारी रात्रीपासून आठ तासांत नागपुरात तब्बल १६४ मि.मी. पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. विजांच्या प्रचंड कडकडाटासह रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास सुरु झालेल्या मुसळधार पावसाने शहरात भयावह परिस्थिती निर्माण केली. अनेक वस्त्या जलमय झाल्या तर अनेकांच्या घरात पाणी शिरले. नाग नदीला पूर येऊन काठावरील वस्त्यांना धोका निर्माण झाला होता.
मुसळधार पावसामुळे शहरातील अंबाझरी तलाव ओसंडून वाहत आहे. यापूर्वी झालेल्या पावसामुळे तलावात पाणी साचले होते मात्र ते ओव्हरफ्लो होण्यासाठी पुरेसे नव्हते. मात्र, काल रात्रीच्या पावसाने ती कसर भरून काढली. शहरातील सखल भागात तसेच पॉश भागात पाणी साचल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात निदर्शनास आल्या आहेत.
(Padole Chowk)पडोळे चौक, (Shankar Nagar)शंकर नगर, (Mangalmurthy Chowk) मंगलमूर्ती चौकात गुडघाभर पाणी साचले होते. रस्त्याचे अक्षरश: तलावात रुपांतर झाले होते. आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागातही चांगला पाऊस झाला. (Hingana)हिंगणा, (Sawner)सावनेर, (Parashivani)पारशिवनी तालुक्यात जोरदार पावसामुळे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, हवामान विभागाने नागपूर शहराला गुरुवारसाठीही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.