भारताच्या ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग’मध्ये 16.8 टक्के वाढ

0

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून दिली माहिती

नवी दिल्ली(New Delhi), 05 जुलै :- भारताने गेल्या काही वर्षात आपली उत्पादन आणि निर्यात क्षमता वाढवली आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात 2023-24 मध्ये 16.8 टक्के वाढ झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Minister Rajnath Singh) यांनी दिली. भारताचे संरक्षण उत्पादन 1.26 लाख कोटींवर गेले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ यांनी आपल्या ट्विटर (एक्स) पोस्टमध्ये म्हटले की, भारताचा मेक इन इंडिया सातत्याने नवनवीन विक्रम करत आहे. भारताने 2023-24 मध्ये संरक्षण उत्पादनाच्या मूल्यात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. 2023-24 मध्ये संरक्षण उत्पादनांचे मूल्य 1,26,887 कोटी रुपयांवर पोहोचले असून, हा आकडा मागील आर्थिक वर्षातील उत्पादन मूल्याच्या तुलनेत 16.8 टक्के अधिक आहे. या यशाबद्दल राजनाथ सिंह यांनी सार्वजनिक क्षेत्रातील (पीएसयू) आणि खाजगी क्षेत्राचे अभिनंदन केले. डीपीएसयू, इतर संरक्षण पीएसयू आणि खाजगी क्षेत्रासह आमच्या संरक्षण उद्योगाचे अभिनंदन. भारताला एक आघाडीचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे राजनाथ यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलेय. केंद्र सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षात 35 हजार कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीसह 1,75,000 कोटी रुपयांचे स्वदेशी संरक्षण उत्पादन साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर, सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षात 21 हजार कोटी रुपयांची संरक्षण निर्यात केली होती, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 32.5 टक्क्यांनी अधिक आहे.

राजनाथ सिंह यांची पोस्ट रिट्विट करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा अतिशय उत्साहवर्धक विकास आहे. या कार्यक्रमात योगदान दिलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो. क्षमता आणखी वाढवण्यासाठी आणि भारताला एक आघाडीचे जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून पुढे आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. यामुळे देशाची सुरक्षा यंत्रणा तर वाढेलच, पण आपल्याला आत्मनिर्भर बनवेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केलाय.