

मुंबईजवळ अरबी समुद्रात प्रवासी बोटीला अपघात
13 जण मृत्युमुखी; 101 जण बचावले
मुंबईजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी ठरला आहे. या घटनेत सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवरील एकूण प्रवाशांपैकी 101 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाच्या डॉक्टरांनी 13 जणांना मृत घोषित केले आहे. मृतांमध्ये 3 नौदलाचे जवान आणि 10 नागरिकांचा समावेश आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे व्हाईस ॲडमिरल सिंग यांनी सांगितले.
या अपघातात गंभीर जखमी झालेले 2 जणांना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर होण्याची प्रार्थना केली जात आहे.
बचावकार्यात तातडीची पावले:
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्टगार्ड, आणि मुंबई पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. या कार्यात नौदलाच्या 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात आली आहे. अद्यापही शोधकार्य सुरू असून सविस्तर माहिती पुढील 24 तासांत मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, या अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी नौदल आणि राज्य सरकारमार्फत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.