

नाट्यसंस्थांसाठी छोटी सांस्कृतिक संकुले व्हावीत – : नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल
– 100 व्या विभागीय नाट्यसंमेलनाचा थाटात शुभारंभ
– कलावंतांच्या मांदियाळीने सभागृह फुलले
नागपूर (Nagpur), 26 एप्रिल
मागील दहा-पंधरा वर्षात डिजिटल युगामुळे तंत्रज्ञान खूप बदलले आहे. त्याचा परिणाम नाटक, नृत्य यासारख्या परफार्मिंग आर्टवर झाला आहे. आता नाट्यसंस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्या असून त्यांना तालमींसाठी आणि कला सादरीकरणासाठी छोटी सांस्कृतिक संकुले उभारली जावी, असे आवाहन 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी केले.
सुरेश भट सभागृहात अतिशय थाटात नाट्य संमेलनाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध अभिनेते शाहबाज खान, आ. अभिजित वंजारी, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, शलाका पवार, सागर कारंडे, भारत गणेशपुरे यांच्यासह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्तीचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, उपाध्यक्ष उपक्रम भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, दीपक मते, संजय रहाटे, सहकार्यवाह दिलीप पोरके व इतर नियामक मंडळ, सर्व शाखा व मध्यवर्तीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जब्बार पटेल यांनी नाटक ही अद्भूत कला असल्याचे सांगत या जादुयी स्पसमध्ये प्रकाशात झोतात कलावंत आपल्या अभिनयाचे ही भूमी उजळून टाकतात, असे सांगितले. नव्या पिढीने नवे
तंत्र आत्मसात करावे व दुस-या भाषेतील नाटकांचे आदान-प्रदान वाढवावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
प्रारंभी पहलगाममधील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मनीष पाटील यांच्या ब्लॉसम डान्स अॅकॅडमीच्या बालकलाकारांनी नयनांची पारणे फेडणारी गणेशवंदना सादर केली. यावेळी ‘संचित’ या गौरवविशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तिकेच्या निर्मितीत साहाय्य करणार्या शुभदा फडणीस आणि विवेक रानडे यांचाही गौरव करण्यात आला.
आ. अभिजित वंजारी यांनी लोककलावंत आणि लेखकांना लाडक्या बहिणी प्रमाणेच मानधन मिळाल्यास त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल असे उद्गार काढले. अजय पाटील यांनी रंगभूमीसोबतच झाडीपट्टी, बालरंगभूमी यासारख्या उपक्रमांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या कलांना वाव देण्यासाठी नागपुरात सभागृह, तालमीची जागा असावी, तसेच मानधन वाढीचा मुद्दा शासनाकडे बैठक आयोजित करून मार्गी लावावा, अशी आ. अभिजीत वंजारी यांच्याकडे मागणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी केले तर आभारप्रदर्शन नरेश गडेकर यांनी केले.
उद्घाटन सोहळ्यात नाट्य व सिनेक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या कलावंतांचा सत्कार करण्यात आला. त्यात विनोदी नट भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे रोहिणी निनावे, मनीषा कोरडे, विनोद देशपांडे, पराग भावसार, शैलेश अनखिंडी, शंतनू रोडे, विनोद देशपांडे, अभिजित जोशी, गिरीश वेलंकीवार, देवेंद्र दोडके, नरेंद्र शिंदे, राजेश चिटणीस, देवेंद्र लुटे, दीप्ती खर्डेनवीस,
पहलगाम येथील दुर्दैवी घटनेमुळे समारंभात सहभागी होऊ न शकल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे संमेलनाला शुभेच्छा दिल्या. या पत्राचे वाचन अजय पाटील यांनी केले. हा केवळ एक सोहळा नसून शतकपूर्तीनिमित्त टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. यातून नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा मिळेल, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशातून केले.
चंद्रकांता, टीपू सुल्तान, बेताल पच्चीसी यासारख्या अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे मूळ नागपूरचे अभिनेते शाहबाज खान संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. सुरुवातीला शिवतांडव स्तोत्र सादर करून त्यांनी नागपूरच्या आठवणींना उजाळा दिला. नागपुरातच बालपण, शिक्षण झाले. मी सगळे स्वप्न इथेच पाहिली. ‘तो मी नव्हेच’ या मराठी नाटकातून पहिल्यांदा काम केले. नागपूर माझ्या नसानसात भिनले आहे, असे सांगत ते नॉस्टेल्जिक झाले.
……..
पारंपरिक लोककलांनी सजली नाट्यदिंडी
सकाळच्या चैतन्यमयी वातावरणात ढोल, ताशा, लेझीम, गुलाबी फेटे, रांगोळीच्या पायघडया आणि सर्व कलाकारांच्या उपस्थितीत आज, 100 व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाची दिंडी निघाली. या दिंडीत नाटय कलावंतांसोबतच पारंपरिक लोककलेतील वासुदेव, पोतराज, पिंगळा, दशावतार, गोंधळी असे लोककलाकार उत्साहाने सहभागी झाले होते. नाट्यदिंडीला नागरिकांचा अननुभूत प्रतिसाद लाभला. पाहणार्यांची, सेल्फी काढणार्यांची आणि हे क्षण मोबाईलमध्ये कैद करणार्या लोकांची दुतर्फा गर्दी होती.
गांधी गेट पासून सुरुवात झालेली ही दिंडी शिवाजी चौक, नरसिंग टॉकीज, कोतवाली चौक, गडकरी वाडा, तुळशीबाग, रेशीमबाग चौक मार्गे कविवर्य सुरेश भट सभागृहात पोहचली. प्रसिध्द सिने अभिनेते शाहबाज खान यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन झाले. याप्रसंगी नरेश गडेकर, अजय पाटील, प्रमोद भुसारी, प्रभाकर आंबोणे, देवेंद्र दोडके, राजेश चिटणीस, वत्सला पोलकमवार, काजल राउत, दीपक देवरणकर असे अनेक श्रेष्ठ, ज्येष्ठ कलावंत दिंडीत सहभागी झाले.
दिंडीत पालखी, विठूमाउली रुखमाईची विलोभनीय मूर्ती, प्रसिध्द काळी, पिवळी मारबत, घोडयावर स्वार असणार्या शूरविरांगना, मोहरमचे वाघ, आदिवासी नृत्य, डोक्यावर समयी घेतलेल्या दीप नृत्यांगना, वस्त्रालंकाराचे वैभव दर्शविणार्या भरजरी नववारीतील स्त्रिया, वारकरी, शिवाजी महाराजांचा देखावा आणि भव्य नटराज मूर्तीचा समावेश होता. विशेष म्हणजे या दिमाखदार नाट्यदिंडीचा हा सुरेख सोहळा नागरिकांनी दारासमोर अनुभवला.
सजले अनोखे स्व. गणेश नायडू कलादालन
सभागृहाच्या प्रवेश दारावरच सजलेल्या स्व. गणेश नायडू कलादालनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. १०० व्या विभागीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने ‘शंभर वर्षातील मराठी नाट्यपरंपरेमधील अविस्मरणीय गाजलेल्या कलाकारांची व्यक्तिचित्र व त्याच्याशी संबंधीत चित्राची पाश्र्वभूमी’ या विषयावर पेंटींग स्पर्धा घेण्यात आली होती. यामाध्यमातून प्राप्त झालेली विद्यार्थी, कलेचे विद्यार्थी, हौशी व व्यावसायिक कलाकारांनी सुमारे एकतीस चित्रे या कलादालनात प्रदर्शित करण्यात आली आहेत.
प्रसिद्ध नेपथ्यकार व चित्रकार स्व. गणेश नायडू यांनी वयाच्या 19 व्या वर्षी चारकोलच्या माध्यमातून चितारलेले चित्र या प्रदर्शनीचे प्रमुख आकर्षण ठरले. या प्रदर्शनात श्रीराम लागू व नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केलेले नटसम्राट, बालगंधर्व व त्यांची नाटके, मोहन आगाशे यांचे घाशीराम कोतवाल, निळू फुले, पु.ल. देशपांडेएकल प्याला, कट्यार काळजात घुसली अशी अनेक चित्रे रसिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली.