


अंतिम विजय धर्माचा असल्याने गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे राहा ! – सनातन संस्थेचे आवाहन
‘ राष्ट्राचे, धर्माचे रक्षण करायचे असेल तर पुढील पिढी संस्कारक्षम करून सक्षम करावी लागेल ‘ – सौ. स्नेहल जोशी, सुदर्शन न्यूज
नागपूर – धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे, हेच खरे गुरुपूजन ठरेल. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणार्यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या आणि शस्त्रबळ अधिक होते; पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला आहे.; कारण भगवंत आणि गुरुतत्त्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्यांवरच असतो. आजही गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक आहे, ही काळाची गरज आहे .
श्री. श्रीकांत पिसोळकर म्हणाले की, भारतावर अंतर्गत आणि बाह्य शत्रूंकडून जी आक्रमणे होत आहेत, ती केवळ विस्तारवादासाठी नाहीत, तर हिंदु धर्माला संपवण्यासाठी होत आहेत. पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी ‘देश’ विचारून नाही, तर ‘धर्म’ विचारून गोळ्या झाडल्या. आतापर्यंतच्या दंगलींचा इतिहासही हेच सांगतो की, जेथे जेथे धर्मांध माजले, तेथे त्यांनी हिंदूंना, हिंदूंच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य केले. आज आपण युद्धसदृश अवस्थेत आहोत. हे फक्त सीमांवरील लढाईसारखे वाटत असले, तरी खरे युद्ध हे धर्मयुद्धच आहे.’ गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यंदा गुरुपौर्णिमा महोत्सव नागपूर सह देशभरातील ७७ ठिकाणी साजरा करण्यात आला.
प्रारंभ श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले गेले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ या विषयावर प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण करण्यात आले. रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नामजपयज्ञ करण्यात आला. विशेष अतिथी सौ. स्नेहल जोशी यांच्या हस्ते श्रीविष्णु आणि श्री विठ्ठल (महात्म्य आणि उपासना) या ebook प्रकाशन करण्यात आले. amazon आणि google play वर हे ebook उपलब्ध आहे.
धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
सुदर्शन न्यूजच्या सौ. स्नेहल जोशी म्हणाल्या की ‘ आपल्या राष्ट्राचे, धर्माचे रक्षण करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तरच आपण या बेगडया विचारवंतांच्या फेक न्यारेटीव्हजचे चे खंडन करू शकू. तसेच पुढील पिढी संस्कारक्षम करून सक्षम करावी लागेल ‘
ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव: देश-विदेशांतील हजारो भाविकांसाठी मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ आणि मल्याळम् भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले. अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला.