

छत्रपती संभाजीनगर, १० नोव्हेंबर : फुलंब्रीतील दरी फाटा येथे शनिवारी मध्यरात्री एका प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून तिघांचा होरपळून मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही आग राजू स्टील आणि प्लास्टिक नावाच्या दुकानात लागली होती. तिथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य साठवलेले होते. आगीमुळे दुकानात धुके आणि गॅस तयार झाल्यामुळे वातावरण अधिक धोकादायक बनले.
रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी लागलेल्या या आगीबद्दलची माहिती दुकान मालक व शेजारी असलेल्या दुकानदारांना समजताच त्यांनी त्वरित दुकान उघडले. मात्र शटर उघडताच आत जमा झालेल्या गॅसचा स्फोट झाला. त्यामुळे तीन लोक बाहेर फेकले गेले. यामध्ये ते लोखंडी साहित्यावर आदळले व गंभीररीत्या होरपळले. यात नितीन रमेश नागरे (२५), गजानन वाघ (३०) आणि राजू सलीम पटेल (२५) या तिघांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेत शाहरुख सलीम पटेल व अजय सुभाष नागरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्यूमुखी पडलेले गजानन वाघ व जखमी शाहरुख पटेल हे चांगले मित्र होते आणि दोघेही होमगार्डमध्ये कार्यरत होते. शाहरुख याचा मयत भाऊ राजू पटेल याचे दुकान असल्याने, हे दोघे आग विझवण्यासाठी घटनास्थळी गेले होते.
फुलंब्री पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले.