


दोन दिवसात कामगारांचे पगार न झाल्यास काम बंद पुकारणार
पिंपरी मेघे सह १४ गावे पाण्यापासून राहणार वंचित
सरकारच्या चुकीच्या धोरणाचा नागरिकांना बसणार फटका ?
रविराज घुमे| वर्धा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पिंपरी मेघे आणि १४ गावं योजना कार्यान्वित असून या योजनेची देखभाल आणि दुरुस्ती चे काम एका एजन्सीला देण्यात आले .
जवळपास ३० कामगार काम करीत आहे. या कामगारांना गेल्या तीन महिन्यापासून पगारच दिला नसल्याने दोन दिवसात पगार न झाल्यास काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा १४ ऑक्टोबर रोजी संबंधित एजन्सीने दिला आहे. त्यामुळे अधिकारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरी कडे पालकमंत्री आणि इतर गावातील पुढारी मुंबईला मंत्रालयात जाऊन पाणी पुरवठा मंत्री यांच्यासोबत आज १५ ऑक्टोबर रोजी बैठक पार पडली.
पाईप लाइन दुरुस्त करताना जे सी पी मशीन, कुशाल आणि अकुशल कारागीर ,वेल्डर, जनरेटर ऑपरेटर, जलशुद्धीकरण करुन पाणी सोडणारे असे मिळून जवळपास ३० कामगार काम करीत आहे.
या एजन्सी मार्फत कामे सुरू असताना गेल्या वर्षभरातील कामगारांचे पेमेंट राज्य सरकारने अदा केले नाही. त्यामुळे एजन्सीने व्याजाने पैसे काढून काही महिन्याचे कामगारांचे पगार दिल्याचे विश्वसनीय माहिती मिळाली.
दिवाळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. त्यात गर्भ श्रीमंता पासून तर हातावर आणून पोटभरणाऱ्या कामगारांपर्यंत दिवाळी सणाचा आनंद घेतात. मात्र गेल्या तीन महिन्यापासून कामगारांचे पगार थकित असल्याने कामगारांनी दिवाळी कशी साजरी करावी हा प्रश्न पडला आहे.
मागील महिन्यात कामगारांना दिवाळी पूर्वी पगार मिळेल असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते. त्या आश्वासनावर कामगार काम करीत होते. मात्र दिवाळी काही दिवसावर येऊनही शासनाकडून निधी मिळण्याची आशा मावळताना दिसत असल्याने दोन दिवसात कामगारांचे पगार न झाल्यास काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे संबंधित एजन्सीने पत्र अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एजन्सीने दिलेल्या पत्रामुळे अधिकारी वर्गाची भंबेरी उडाली असून वरिष्ठ अधिकारी निधी मिळण्याची कसरत करीत असल्याचे सांगण्यात आले.
*पाणी पुरवठा मंत्री आणि पालकमंत्री यांची बैठक*
मंत्रालय, मुंबई येथे पिपरी (मेघे) व १३ गावे या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक १५ ऑक्टोबर रोजी पार पडली. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रगती, निधी वितरण, तांत्रिक बाबी तसेच गावांतील प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून संबंधित गावांतील नागरिकांना शाश्वत, स्वच्छ आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा हेतू असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
या प्रसंगी संबंधित अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे प्रशांत बुरडे, शाखा अभियंता दीपक धोटे तसेच स्थानिक लोप्रतिनिधी अजय वरटकर (नालवाडी), माजी सरपंच अजय गौळकर (पिपरी), माजी सरपंच सचिन खोसे (उमरी), सरपंच गौरव गावंडे (साटोडा), माजी सरपंच अजय जानवे, माजी उपसरपंच विलास दोड (सावगी), उपसरपंच संदेश किटे (मसाळा), उपसरपंच आशिष कुचेवर (सालोड), ग्रामपंचायत सदस्य नितीन डफरे (बोरगाव) यांची उपस्थिती होती..