

खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचा थाटात शुभारंभ
नागपूर (Nagpur) : १५ फेब्रुवारी ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य अधिकाधिक आनंदी करण्याचा, त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता यावी, त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे, प्रसन्न मनाने त्यांना सामाजिक कार्यात योगदान देता यावे, या उद्देशाने दरवर्षी विविध शिबिरांसह खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहून महोत्सवामागचा उद्देश सफल होत असल्याचे दिसते आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त् केले.
नितीन गडकरी यांची संकल्पना असलेल्या खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सुरेश भट सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते या सोहळ्याचे थाटात उद्घाटन झाले. मंचावर ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दत्ता मेघे, पद्मश्री डॉ. विलास डांगरे, डॉ. संजय उगेमुगे, अशोक मानकर, हाजी शकील सैफी, प्रतापसिंग चव्हाण यांची उपस्थिती होती.
ज्येष्ठ नागरिकांना सहलीचा आनंद घेता यावा यासाठी आणखी चार इलेक्ट्रिक बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगत नितीन गडकरी यांनी कमाल चौकात अल्पदरात सर्व वैद्यकीय चाचण्या व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती दिली. वर्धा रोडवर सात मजली इमारत आकाराला येत असून, त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी निःशुल्क सभागृह व ऑरगॅनिक फ्रुट बाजार राहील, असे ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध शिबिरांसह, पुर्णब्रम्ह अन्नदान योजना आदींची माहिती त्यांनी दिली.
प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांची प्रमुख उपस्थिती
नितीनजींसारख्या अभ्यासू, काळजीवाहू नेत्यामागे खंबीरपणे उभे राहून, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानला सहकार्य करावे, असे आवाहन दत्ता मेघे यांनी यावेळी केले. प्रारंभी दीप प्रज्वलनानंतर डॉ. विलास डांगरे यांच्यासह इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी यांनी केले.
…..बॉक्स
पुरस्काराचे खरे वाटेकरी जनताजनार्दन ! : डॉ. विलास डांगरे
लक्षावधी रुग्णांना जीवनदान देणारे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नितीन गडकरी यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना डॉ. डांगरे म्हणाले, या पुरस्काराचे खरे वाटेकरी जनता जनार्दन आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाने समाजाची सेवा करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र निवडले व त्यातच जीवनाची सार्थकता गवसली. हा पुरस्कार मी जनमानसाला समर्पित करतो, असे भावोद्गार डॉ. डांगरे यांनी काढले.
…….बॉक्स….
मराठीमुळे सिनेजगतात संधी : जितेंद्र
अतिशय सज्जन, कामाचा मोठा आवाका असणाऱ्या नितीन गडकरी यांनी या महोत्सवाचे आमंत्रण दिल्याचा विशेष आनंद आहे. नागपूरवासियांना भेटून ‘बिछडा यार’ मिळाल्याची अनुभूती आली, असे उद्गार जितेंद्र यांनी काढले. रसिकांनी मराठीतून बोलण्याचा आग्रह धरल्यानंतर जितेंद्र यांनी गिरगावातील जीवनाचा सुखद काळ मराठीमध्ये रसिकांसमोर उभा केला. ते म्हणाले, त्या जुन्या दिवसात आनंद, शांतता होती. त्या अप्रूप क्षणांना मी खूप मिस करतो. मी ज्युनियर आर्टिस्ट असताना, माझ्या मराठी ज्ञानाचे कौतुक वाटून शांतारामबापू यांनी मला ब्रेक दिला. त्यांच्या अस्खलिखीत मराठीने श्रोत्यांचे मन जिंकले.
……
लोकप्रिय गीतांची कहाणी ‘समीर की जुबानी’
गीतकार समीर अंजान यांनी दिला गत आठवणींना उजाळा
नागपूर, 15 फेब्रुवारी
शेकडो सुपरहिट गीतांचे गीतकार समीर अंजान यांनी त्या गीतांमागील कथानक, शेरोशायरी, जीवनानुभव, कारकिर्दीतले गंभीर, खुसखुशीत किस्से सांगत सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ज्येष्ठ रसिकांना रिझवले. लोकप्रिय गीतांची कहाणी ‘समीर की जुबानी’ ऐकायला मिळाल्यामुळे रसिकही नॉस्टेल्जिक झाले.
खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन सत्रानंतर ‘हिट्स ऑफ समीर अंजान’ या कार्यक्रमाचे सुरेश भट सभागृहात आयोजन करण्यात आले होते. समीर अंजान यांनी कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मंचावरून खाली उतरून नितीन गडकरी यांना वंदन केले. नागपूर येथे गडकरी यांनी मला विलंबाने बोलवले, कदाचित ते माझ्या सिनियर सिटीझन होण्याची वाट बघत असावे, अशी गोड तक्रार समीर यांनी यावेळी केली. नागपूरच्या पावन भूमीवर संवाद साधता येणे हे भाग्य आहे, असे सांगत समीर यांनी नितीन गडकरी यांचा कर्मठ, कर्मयोगी राजनेता या शब्दात गौरव केला व अथांग प्रेम व्यक्त केले.
काही गाण्यात उत्तम शब्दकळा असते तर काही गाणी सवंग असतात. त्याचे कारण म्हणजे चित्रपटाची कथा किंवा त्यातील व्यक्तीरेखेला अनसरुन लेखणी झरत असते, असे गिनिज बुक रेकॉर्ड धारक समीर अंजान म्हणाले. याप्रसंगी नितीन गडकरी, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दत्ता मेघे आणि प्रसिध्द अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते समीर यांना सन्मानित करण्यात आले. दृकश्राव्य माध्यमातून समीर यांची जीवनगाथा सफरनामा : स्टोरी बिहाईंड साँग उलगडण्यात आली.
कुंभमेळ्याच्या पृष्ठभूमीवर ‘मानो तो मैं गंगा हू’ या गीताने मैफलीला प्रारंभ झाला. तुम पास आये, घुंघट की आड से, मेरे ढोलना, परदेसी परदेसी, मुझे नौलखा मंगा दे, खैईके पान बनारसवाला, चिठ्ठी आई है, सुनो गौरसे दुनियावालो या गाण्यानंतर मस्त बहारोंका मैं आशिक हे जितेंद्र यांच्यावर चित्रीत केलेले गाणे सादर करताच प्रेक्षक जल्लोष करीत नाचायला लागले. शैलेश दाणी यांच्या संगीत संयोजनात डॉ. वैशाली उपाध्ये, सारंग जोशी, सागर मधुमटके, सोनाली दिक्षित, श्रेया टांकसाळे यांनी गीतगायन केले. वाद्यवृंदात अरविंद उपाध्ये, परिमल जोशी, महेंद्र ढोले, गौरव टांकसाळे, रितेश, अशोक टोकलवार, सुभाष वानखेडे, दीपक कांबळे, विक्रम जोशी, अक्षय हरले, प्रदीप ठाकूर, राजू पडीयार, सपन चौधरी, गॉडविन जोसेफ, मोहन गोयल, मोहसीन खान, निरज राठोड, राजेश कपूर, चंदर मकवाना, एरोल मॉनसेरेट यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळासाहेब कुळकर्णी यांनी केले. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने गायक व वादकांचा सत्कार करण्यात आला.