खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव यंदा 7 नोव्‍हेंबरपासून

0


चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा

‘संत्रानगरी’ ला ‘सांस्कृतिक नगरी’ अशी ओळख मिळवून देण्याचे श्रेय नितीन गडकरींना

 महोत्‍सव स्‍थळाचे उत्‍साहात भूमिपूजन संपन्‍न

नागपूर, 12 ऑक्टोबर
लोकनेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून, सांस्कृतिक मूल्यांचे जतन आणि परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी आयोजित ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव – 2025’ चे यंदाचे 10 वे पर्व असून हा महोत्‍सव येत्‍या, 7 ते 18 नोव्‍हेंबर दरम्‍यान आयोजित करण्‍यात येणार असल्‍याची घोषणा खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष तसेच, राज्‍याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे पटांगण, क्रीडा चौक येथे चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍या हस्‍ते महोत्‍सव स्‍थळाचे भूमिपूजन करण्‍यात आले त्‍यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला समितीचे सदस्‍य जयप्रकाश गुप्ता, भारती गुप्ता व अव‍िनाश घुशे यांच्‍या हस्‍ते महोत्‍सव स्‍थळाचे विधीवत पूजन करण्‍यात आले. त्‍यानंतर बावनकुळे यांनी नारळ फोडून व कुदळ मारून स्‍थळाचे भूमिपूजन केले.
यावेळी मंचावर आमदार कृष्णाजी खोपडे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार मिलिंद माने, भाजप शहर अध्‍यक्ष दयाशंकर तिवारी, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, गौरीशंकर पाराशर, जयप्रकाश गुप्‍ता, डॉ. दीपक खिरवडकर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, “नितीनजींनी सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, आरोग्य अशा 18 विविध क्षेत्रांत देशाला मजबूत करण्याचे कार्य केले आहे. सांस्‍कृतिक महोत्‍सवामुळे हजारो कलाकारांना मंच मिळाला असून, प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाची उंची वाढत आहे. हा महोत्सव केवळ मनोरंजनासाठी नाही, तर समाजात संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविणारा ठरला आहे.”
यंदा महोत्सवाचे 10 वे पर्व असून देशभरातील हजारो कलाकार या सांस्कृतिक पर्वात सहभागी होणार आहेत. नागपूर, महाराष्ट्र आणि देशाला भेट ठरणारा हा महोत्सव सर्व नागपूरकरांसाठी आनंदाचा सोहळा ठरेल, अशी भावना यावेळी त्‍यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक करताना प्रा. अनिल सोले यांनी सांगितले की, “नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीतून 2017 पासून सुरू झालेला हा महोत्सव आज 10व्या पर्वात पदार्पण करत आहे. कला, साहित्य, संस्कृती आणि परंपरेचा संगम घडवून आणणारा हा उत्सव आज राष्ट्रीय पातळीवर अग्रक्रमावर पोहोचला आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले तर प्रा. राजेश बागडी यांनी आभार मानले.